Uttarakhand Uttarkashi Tunnel Accident Food Supply Inside Tunnel For First Time After 9 Days Watch Video
Uttarkashi Tunnel Accident : उत्तराखंडमधील उत्तरकाशीमध्ये निर्माणाधीन बोगद्यात अडकलेल्या मजुरांना सोमवारी पहिल्यांदाच अन्न पाठवण्यात आलं. नऊ दिवसानंतर पहिल्यांदाच बोगद्यामध्ये अडकलेल्या मजुरांना खिचडी पाठवण्यात आली. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे. उत्तरकाशीमध्ये बोगदा कोसळून झालेल्या दुर्घटनेत 41 मजूर 12 नोव्हेंबरपासून अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य राबवलं जात आहे. आज या बचावकार्याचा दहावा दिवस आहे.
दहा दिवसांपासून 41 मजूर अडकले
उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे निर्माणाधीन बोगद्यात गेल्या दहा दिवसांपासून 41 मजूर अडकले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी 200 हून अधिक लोकांची टीम 24 तास बचावकार्य करत आहे. दरम्यान, बोगद्यात अडकलेल्या कामगारांना सोमवारी प्रथमच अन्न पाठवण्यात आले. खुद्द मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, पहिल्यांदाच अडकलेल्या मजुरांसाठी खिचडी पाठवण्यात आली.
सिल्क्यारा, उत्तरकाशी में निर्माणाधीन टनल में फँसे श्रमिकों को आज 6 इंच व्यास की पाइप मलबे के आरपार होने के बाद पहली बार खिचड़ी भेजी गई है।
सभी श्रमिक भाइयों को सकुशल बाहर निकालने हेतु निरंतर बचाव कार्य गतिमान है। pic.twitter.com/fN8KlH0gau
— Pushkar Singh Dhami (@pushkardhami) November 20, 2023
41 मजुरांची सुटका कधी?
बोगद्यात अडकलेल्या कामगारांना वाचवण्यासाठी आणखी काही दिवस वेळ लागण्याची शक्यता आहे. बोगदा बांधकाम तज्ज्ञांच्या मते, सध्याची परिस्थिती पाहता कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी आणखी पाच दिवस ते एक आठवडा लागू शकतो. बोगदा कोसळल्यानंतर मलबा हटवण्याच्या चुकीमुळे बचावकार्याचा वेळ वाढला आहे.
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांचं ट्विट
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी ट्वीट करत सांगितलं आहे की, ‘उत्तरकाशीतील सिल्क्यरा येथे निर्माणाधीन बोगद्यात अडकलेल्या मजुरांना पहिल्यांदा खिचडी पाठवण्यात आली आहे. ढिगाऱ्यातून 6 इंच व्यासाचा पाइप आतमध्ये टाकण्यात आला आहे. या पाईपलाईनद्वारे आवश्यकतेनुसार अन्नपदार्थ, औषधे आणि इतर वस्तू कामगारांना सहज पाठवल्या जात आहेत. केंद्रीय यंत्रणा, SDRF आणि राज्य प्रशासनाचे पथक अथक परिश्रम करत बचाव कार्यात गुंतलेले आहेत. सर्व कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी आम्ही युद्धपातळीवर काम करत आहोत.’
जीवनावश्यक वस्तू पाठवण्याची योजना
कामगारांना जेवण मिळाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांमध्ये दिलासादायक वातावरण आहे. मजुरांचे कुटुंबिय बोगद्याच्या बाहेर त्याच्या परतीची वाट पाहत आहेत. सिल्क्यरा येथील बोगद्यात अडकलेल्या मजुरांसाठी पाइपलाइनद्वारे औषधे, संत्री आणि ज्यूस पाठवण्यात येत आहे. याशिवाय मजुरांशी वॉकीटॉकीने संपर्क सुरु आहे. बोगद्यामध्ये चार्जर आणि बॅटरी पाठवण्याची योजना आहे.
12 नोव्हेंबरला पहाटे 4 वाजता घडला अपघात
सिल्क्यरा बोगद्यात 12 नोव्हेंबरला पहाटे 4 वाजता हा अपघात घडला होता. बोगद्याच्या प्रवेशाच्या 200 मीटरच्या आत 60 मीटर माती खचली आणि 41 मजूर आत अडकले. 16 नोव्हेंबर रोजी बचाव कार्यादरम्यान, बोगद्यातून आणखी दगड पडले, ज्यामुळे मलबा एकूण 70 मीटरपर्यंत पसरला आहे.